देशाला अभिमान वाटावा अशी कामगीरी मनू भाकरने पुनः एकदा केली आहे. मनू भाकर हिने सर्बज्योत सिंह याच्या सोबतीने आणखी एका कांस्य पदकाची कमाई भारताला करुन दिली. दोघांनी १० मीटर एयर पिस्टल मिश्र संघ प्रकारात देशाला कांस्यपदक मिळवून दिले. या यशासोबतच मनूने एक मोठा इतिहास रचला आहे.
सध्या जगभरात आपल्या देशाची श्रीमंती दाखवून देण्यासाठी अनेक गोष्टींना मोजमाप म्हणून पाहिले जाते. त्यापैकीच एक आहे ऑलिम्पिक स्पर्धा. ज्या देशाकडे जितके जास्त मेडल तेवढी त्या देशाची प्रतिष्ठा मोठी अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहिले जाते. अशातच इतर देशांच्या तुलनेत भारत आपली आर्थिक प्रगती साध्य करत असताना मागील काही ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याची कामगिरी सुद्धा सुधारताना दिसत आहे. यावर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची सुरवात भारतासाठी चांगली करणारी मनू भाकर हिने एक मोठा विक्रम तिच्या नावे केला आहे.
एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन मेडल मिळवणारी मनू भाकर ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. सर्व भारतीयांसाठी हि अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. सर्व स्तरातून तिच्या ह्या यशाचे कौतूक होत आहे. या संपुर्ण स्पर्धेत जास्तितजास्त पदके आपल्या पारड्यात कशी येतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.