जळगाव- दि.२५ रोजी 'लखपती दीदी' प्रशिक्षण मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील विमानतळासमोरच्या मैदानावर हा मेळावा होणार आहे. या 'लखपती दीदी' प्रशिक्षण मेळाव्याच्या निमित्ताने मोदी हे सव्वा दोन तास जळगाव दौऱ्यावर येणार असतील या मेळाव्यात खान्देशसह बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाभार्थी महिलांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. जळगाव विमानतळावरील प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी 'लखपती दीदीं'शी संवाद साधतील. या दौऱ्यात ते नवी दिल्लीहून सरळ जळगावला येणार आहेत. मेळाव्याला मार्गदर्शन केल्यानंतर ते नवी दिल्लीकडे रवाना होतील. त्यांच्या या दौऱ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्वच प्रशासन आता पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या नियोजनात व्यस्त झाले आहेत.
प्रशिक्षण मेळाव्यासाठी येणार्यांना नाश्ता व जेवण
तालुका पातळीवरून येणाऱ्या महिला लाभार्थ्यांना नाश्ता पुरविला जाणार आहे. तसेच कार्यक्रमानंतर त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. आठ दिवस हातात असल्याने जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने या जेवणाच्या तयारीनिमित्त शुक्रवारी एक बैठक घेतली. त्यानुसार दि.२१ रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत. अवघ्या तीनच दिवसात एक लाख लाभार्थ्यांच्या नाश्ता व जेवणाची व्यवस्था करावी लागणार असल्याने कंत्राटदाराचीही मोठी धावपळ होणार आहे.