सातारा जिल्ह्यातील भिलार हे ‘पुस्तकांचे गाव’ सर्वश्रुत आहे. याच धर्तीवर राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात ‘पुस्तकांचे गाव’ उभारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला प्रत्येक विभागात एका गावाची त्यासाठी निवड करण्यात आली. त्यात आता नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्यातील साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथे ‘पुस्तकांचे गाव’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमळनेर येथील खान्देश मंडळाला तशी मान्यता देण्यात आल्याचे आदेश मंगळवारी राज्य सरकारने काढले आहेत.
या योजनेअंतर्गत अमळनेर येथे विविध प्रकारच्या साहित्य, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवास वर्णनपर ग्रंथांनी सुसज्ज अशी दालने उभी केली जातील. ही रचना उभी करताना त्यामध्ये स्थानिक गावकऱ्यांचा सहभाग घेतला जाईल. यातून वाचनसंस्कृती रुजविण्यासह मराठी भाषा, साहित्याचे जतन, प्रसार आणि प्रचाराबरोबरच पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.
पाच ठिकाणी होणार ग्रंथालय
१) खा. शि मंडळ, अमळनेर, २) संत सखाराम महाराज वाडी संस्थान, ३) विक्टोरिया ज्युबली ग्रंथालय, ४) मंगळ ग्रह संस्था आणि ५) मराठी वाङ्मय मंडळ
या पाच ठिकाणी होणाऱ्या नविन ग्रंथालयासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये मिळणार आहेत. त्यातून भव्य ग्रंथालयांची उभारणी होणार आहे.
अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा
अमळनेरला नुकताच ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळाला होता. त्या पाठोपाठ ‘पुस्तकांचे गाव’साठी निवड झाल्याने अमळनेरच्या शिरपेचाच आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अमळनेर ही साने गुरुजी यांची कर्मभूमी तसेच साहित्यनगरी म्हणून परिचित आहे. ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून मान मिळाल्याने त्यातून वाचनसंस्कृती रुजविण्याचे काम करण्यात येईल.