नंदुरबारचे पालकमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी नंदुरबारमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात लाडकी बहीण योजनेचा लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम पुणे येथील बालेवाडीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार होता त्याचे लाईव्ह प्रक्षेपण नंदुरबारमधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात आयोजित केले होते.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात लावलेले स्क्रीन वरील प्रक्षेपण सर्वांनी पाहावा ही अपेक्षा राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांची होती.
‘लाडकी बहीण' योजनेअंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच, जमलेल्या महिलांनी काढता पाय घेतला. त्यामुळे मोठ्या स्क्रीनवर उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण ठोकत असताना समोर ऐकायला कोणीच नसल्याचे चित्र दिसून आले.
कार्यक्रम चालू असतांना नाट्यगृहाचा रखवालदार खुर्चीवर पाय ठेवत राजेशाही पद्धतीने कार्यक्रमाची मजा घेत होता. हॉलमध्ये १६ जण उपस्थित होते.
अश्या प्रकारे नंदुरबारचे पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र बघायला मिळाले.