नीट परीक्षेत ७२० पैकी ६६२ गुण मिळवणाऱ्या कल्याणीचा मा. आ. शिरीष चौधरींच्या हस्ते सत्कार




बहादरपूर, ता. पारोळा : अमळनेर येथील श्री नारायणदास तेच मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कल्याणी रतिलाल चौधरी हिने नीट परीक्षेत ७२० पैकी ६६२ गुण मिळवून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल तिचा अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमात बहादरपूरचे माजी सरपंच सोमनाथ चौधरी, गोकुळ चौधरी, सरपंच रमेश बैसाणे, बहादरपूरचे सरपंच भिकन पारधी, रोजगार हमी योजनेचे समन्वयक प्रवीण सुतार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वासुदेव लोहार, माजी उपसरपंच परेश चौधरी, शुभम चौधरी, शरद चौधरी, श्याम चौधरी, योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 


श्री चौधरी यांनी यावेळी बोलताना कल्याणीने बिकट परिस्थितीतून जिद्दीने अभ्यास करून मिळवलेले हे यश अत्यंत गौरवास्पद असल्याचे सांगितले. कल्याणीने बारावीत ८८ टक्के गुण मिळवले होते. तिचे वडील रतिलाल राजाराम चौधरी हे खासगी कंपनीत काम करतात, तर आई नीता चौधरी घरकाम करून मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात. मुंदडा विद्यालयाचे प्रा. योगेश चौधरी यांची ती भाची असून, त्यांच्या मार्गदर्शनाचा तिला लाभ झाला.


फक्त ऑनलाइन अभ्यास आणि टेस्ट सिरीजवर आधारित कठोर मेहनत करत, सतत १८ तास अभ्यास करून कल्याणीने हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post