अमळनेर: अमळनेर तालुक्यातील पुरवठा विभागात खाजगी एजंटांचा बेकायदा कारभार सुरू असून, नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या या विभागात खाजगी एजंटांनी धाडस दाखवत नागरिकांकडून शिधा कार्ड नूतनीकरण, नाव वाढवणे किंवा कमी करणे यांसारख्या कामांसाठी मोठी रक्कम उकळल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
या बेकायदा कारभारामुळे नागरिकांना साध्या ऑनलाइन कामांसाठीही हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. विशेषतः एनपीएच कार्ड धारकांना पीएचएच कार्ड मिळवून देण्यासाठी एजंट पैसे घेत असल्याचे आरोप आहेत. पैसे न दिल्यास नागरिकांना विभागातील कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जात असून, वशिला लावल्याशिवाय कोणतेही काम होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
रेशन दुकानांमधील शिधा वाटप पद्धतीतही अनियमितता आढळून आली आहे. विशेषतः शासनाच्या लाडकी बहिण योजनेत शिधा कार्ड आवश्यक असल्याने नवीन कार्ड मिळवण्यासाठी नागरिकांना एजंटांच्या दावणीला बांधून ठेवले जात आहे.
या सर्व प्रकरणांमुळे अमळनेर तालुक्यात असंतोष पसरला असून, या बेकायदा कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.