अमळनेर : अमळनेर तालुक्यातील धार येथील पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका बारावीच्या विद्यार्थ्याचा शुक्रवारी बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी मारवड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत तरुणाचे नाव जयेश दीपक पाटील (वय १८) असून, तो कंडारी गावाचा रहिवासी होता. शिक्षणासाठी जयेशने शहरातील अयोध्या नगरात खोली घेऊन राहणे सुरू केले होते. प्रताप महाविद्यालयात अकरावी पूर्ण केल्यानंतर बारावी शिक्षणासाठी त्याने मारवड येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. जयेश हा दीपक भरत पाटील यांचा एकुलता एक मुलगा असून, त्याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण, आजी आणि आजोबा असा परिवार आहे.
शुक्रवारी दुपारी जयेश आणि त्याचे दोन मित्र धार येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. पाण्यात असलेल्या मंदिरापर्यंत पोहण्याची स्पर्धा त्यांच्यात सुरू झाली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने जयेश तलावात बुडाला. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मारवड पोलिसांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी सुनील तेली, मुकेश साळुंखे आणि काही नागरिकांच्या मदतीने जयेशचा मृतदेह तलावातून काढण्यात आला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी जयेशला मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.