अमळनेर नगरपरिषदेचा सुवर्ण क्षण: 'माझी वसुंधरा 4.0' मध्ये सर्वोच्च स्थान


अमळनेर: १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत झालेल्या 'माझी वसुंधरा 4.0' अभियानात अमळनेर नगरपरिषदेने नाशिक विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. जळगाव जिल्ह्यातही अमळनेर नगरपरिषद सर्वोत्तम ठरली असून, राज्यात ५० हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदांच्या गटात अमळनेरचा ७वा क्रमांक आला आहे. मागील वर्षीच्या 'माझी वसुंधरा 3.0' अभियानात अमळनेर नगरपरिषद १५व्या क्रमांकावर होती, तर यावर्षी त्यांनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे.


नाशिक विभागात अमळनेर नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला असून, खान्देशातील शिरपूर वरवाडे नगरपरिषदेने दुसरा क्रमांक मिळवला आहे. अमळनेर नगरपरिषदेने ७५ लाख रुपये बक्षीस रक्कम जिंकली आहे, जी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची साक्ष देते.


अमळनेर नगरपरिषदेच्या यशाबद्दल प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर, तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, स्वच्छता निरीक्षक संतोष बिराडे, बांधकाम अभियंता अमोल भामरे, उपमुख्य अधिकारी संदीप गायकवाड, विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर, पाणीपुरवठा अभियंता प्रवीण कुमार बैसाणे, आरोग्य निरीक्षक हैबतराव पाटील आणि सर्व सफाई कर्मचारी तसेच माझी वसुंधरा टीमचे गणेश ब्रम्हे, अनंत संदानशिव, आनंद बिऱ्हाडे, गौतम बिऱ्हाडे, महेंद्र बिऱ्हाडे, शाम करंदीकर, युनूस शेख व समन्वयक गणेश गढरी यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले आहे.


अमळनेर नगरपरिषदेची ही यशोगाथा शहराच्या शाश्वत विकासाची नांदी ठरेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post