अमळनेर तालुक्यातील वावडे गावातील व्यायामशाळेचे उद्घाटन अखेर स्थानिक नागरिक शरद दिलबर वणखेडे यांनी स्वतः करून टाकले. कारण मागील सहा महिन्यांपासून मंत्री अनिल पाटील यांच्याकडे या व्यायामशाळेच्या उद्घाटनासाठी वेळच नव्हता. यामुळे गावातील तरुण पिढी व्यायामाच्या सोयी-सुविधांपासून वंचित राहिली होती.
मंत्री पाटील यांची वेळ आणि निधी दोन्ही प्रश्नचिन्हात
सहा महिन्यांपासून रखडलेले हे उद्घाटन आणि व्यायामशाळेचा वापर सुरु न होणे हे स्थानिकांना आणि युवा पिढीला त्रासदायक ठरले आहे. सरकारच्या निधीतून बांधलेली व्यायामशाळा केवळ मंत्र्यांच्या वेळेअभावी वापरात येत नाही, हा प्रकार मंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
मंत्री पाटील यांचे सहा महिने - तरुणाईला व्यायामापासून वंचित ठेवले!
स्थानिक तरुणांनी स्पष्ट केले की, सरकारी निधी हे जनतेचे असतात, फक्त मंत्री आणि अधिकारी यांच्या प्रसिद्धीसाठी ठेवलेले नसतात. मंत्री अनिल पाटील यांनी वेळ न दिल्याने, तरुण पिढीला व्यायामाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
कामचुकारपणाचा फटका अमळनेरच्या जनतेला
मंत्री अनिल पाटील हे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, त्यांच्या कामचुकारपणामुळे जनतेला विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागतो आहे. प्रत्येक कामात होणारी दिरंगाई हा मंत्री पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उभा करतो.