राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यास ११ लाख बक्षीस: शिंदेसेना आमदार संजय गायकवाड यांचे धक्कादायक विधान


बुलढाणा:
शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी सोमवारी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस देऊ, असे वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस पक्षाने गायकवाड यांच्या विधानाचा आक्रमक निषेध केला आहे. बुलढाणा पोलिसांनी गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


गायकवाड म्हणाले, "राहुल गांधी यांचे आरक्षणविरोधी वक्तव्य काँग्रेसचा खरा चेहरा उघड करत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आरक्षण तसेच संविधान संपवत असल्याचा प्रचार करणाऱ्या काँग्रेसचे खोटेपण आता समोर आले आहे."


याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील भाजप-शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून वागायची अक्कल नाही, त्याने राहुल गांधींवर बोलू नये. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे."


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर टीका करत म्हटले, "आमदार लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांची जीभ छाटण्यासाठी बक्षीस जाहीर करतात आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री बघे बनून राहतात."


दरम्यान, शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत निष्ठेचा शब्द उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत विष्ठेसारखा झाला असल्याचे विधान केले. त्याचबरोबर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर जातीयवाद निर्माण केल्याचा आरोप करत महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला कॅन्सर पवारांमुळे झाला असल्याचे वक्तव्य केले.


या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post