मुंबई: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप १५० ते १६० जागा लढवणार असल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत मिळाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेत भाजपने १५५ जागा लढवाव्यात, आणि उर्वरित जागा शिंदे सेना व अजित पवार गटात वाटल्या जाव्यात, अशी चर्चा झाली.
शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेत शाह यांनी स्पष्ट केले की भाजप कोणत्याही परिस्थितीत १५० पेक्षा कमी जागा लढणार नाही. त्यामुळे भाजपकडून १५५ जागा लढण्याचे संकेत मिळाले आहेत, तर उर्वरित १३३ जागांची वाटणी शिंदे सेना आणि अजित पवार गटाला होणार आहे.
३९ जागांची कसरत
शिंदे आणि अजित पवार गटातील सिटिंग आमदार आणि संभाव्य उमेदवार यांच्यावर आधारित ३९ जागांची वाटणी अजून ठरवायची आहे. या जागांचे अंतिम वाटप कसे होईल यावर संपूर्ण महायुतीच्या फॉर्म्युलावर अवलंबून राहणार आहे.