अमळनेर: अमळनेरकडून ढेकू गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. पावसामुळे रस्त्यावरील डांबर उखडले गेले असून, खड्ड्यांची साखळी तयार झाली आहे. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग जळगाव व धरणगावकडे जाण्यासाठी महत्त्वाचा असून, रोज रहदारीचा भाग आहे. मात्र, खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि प्रवासी संतप्त आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावर खडी विखुरल्याने मोटारसायकलस्वारांना अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच, दोन्ही बाजूला वाढलेले काटेरी झुडपे व गवत वाहन चालवताना अडचण निर्माण करतात, विशेषतः रात्रीच्या वेळी. सूचना फलक तुटलेल्या अवस्थेत असल्याने वाहनचालकांना मार्गदर्शन मिळत नाही.
ढेकू ग्रामस्थानीं सांगितले की, "रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने पावले उचलावी लागतील. दुचाकीस्वारांना या खड्ड्यांमुळे नेहमीच अपघात होत आहेत." वाहनधारकांनी संबंधित विभागाकडे नवीन रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे, कारण सध्या होणारी डागडुजी अपुरी आणि त्रासदायक ठरत आहे.