नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपने तीव्र टीका केली आहे. भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या अमेरिकी लोकप्रतिनिधी इल्हान उमर आणि अन्य व्यक्तींसोबतच्या भेटीबद्दल भाजपने बुधवारी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी या भेटींना "धोकादायक" संबोधले आणि राहुल गांधींच्या परदेशातील हालचालींना भारताच्या सुरक्षेसाठी घातक असल्याचे म्हटले.
इल्हान उमर यांच्याबाबत भाजपने दाखवलेल्या नाराजीचे कारण म्हणजे त्यांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला होता, जो पाकिस्तानने प्रायोजित केला असल्याचे समोर आले होते. उमर यांनी यापूर्वीही काश्मीर मुद्द्यावर भारतविरोधी भूमिका घेतली होती.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप व शिंदे गटावर खोटे प्रचार करीत असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानांचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला असल्याचा आरोप करत राहुल गांधींनी भारताच्या बदनामीचा उद्योग सुरू ठेवला असल्याचे म्हटले आहे.