भारतीय खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये अपूर्व कामगिरी करताना क्लब थ्रो प्रकारात सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावून देशाचा दबदबा सिद्ध केला आहे. एफ-५१ क्लब थ्रो स्पर्धेत धर्मबीरने आशियाई विक्रम मोडून सुवर्ण जिंकले, तर प्रणव सूरमा याने रौप्यपदक मिळवले.
धर्मबीर याने स्पर्धेत सुरुवातीचे चार प्रयत्न अवैध ठरल्यानंतर पाचव्या प्रयत्नात ३४.९२ मीटरची फेक करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. प्रणवने ३४.५९ मीटरची फेक करत रौप्यपदक प्राप्त केले. सर्बियाच्या फिलिप ग्राओवाकने ३४.१८ मीटरसह कांस्यपदक जिंकले.
धर्मबीरचे हे सुवर्णपदक भारताचे पॅरालिम्पिकमधील पाचवे सुवर्ण ठरले आहे. अपघातामुळे गंभीर जखमी झालेला धर्मबीर आपल्या पुनरागमनाने भारतीय क्रीडा क्षेत्रात प्रेरणादायी ठरला आहे.
धर्मबीरने आपल्या विजयानंतर आपल्या मार्गदर्शक अमितकुमार सरोहा यांचे आभार मानत हे सुवर्णपदक त्यांना समर्पित केले. अमितकुमार यांचे प्रशिक्षण धर्मबीर आणि प्रणवच्या यशामध्ये निर्णायक ठरले असून शिक्षक दिनी मिळालेली ही गुरुदक्षिणा अमितकुमारसाठी भावनिक क्षण ठरली.