मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढेल, पण मुख्यमंत्री कोण होणार हे निवडणुकीनंतर ठरेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपचे संसदीय मंडळ हा निर्णय शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून घेईल, असेही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित न झाल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. यापूर्वी शरद पवार आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी, संख्याबळानुसार मुख्यमंत्री ठरवण्याचे विधान केले होते. फडणवीस यांनी मात्र, "निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार, हे सांगण्याचा अधिकार माझा नाही," असे म्हणत मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय भाजपच्या संसदीय मंडळावर सोडला.
अजित पवार यांच्याशी केलेल्या युतीविषयी फडणवीस म्हणाले की, शिंदे यांच्यासोबतची युती नैसर्गिक आहे, तर अजित पवार यांच्याशी झालेली युती ही राजकीय आहे. मात्र, पुढील काही वर्षांत तीही नैसर्गिक युतीत रुपांतरित होईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट करत फडणवीस म्हणाले, "आमच्याकडे चेहऱ्याचा वाद नाही. निवडणुकीत चेहरा मुख्यमंत्र्यांचाच असतो आणि त्याच नेतृत्वात निवडणूक लढवली जाते."
*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.*