जळगाव – सुवर्ण व्यवसायात आघाडीवर असलेल्या जळगावला ‘गोल्ड क्लस्टर’ करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केली आहे. मंगळवारी अजिंठा विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी, सुरेश भोळे, लता सोनवणे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील विविध योजनांचा आढावा घेताना जलजीवन मिशन, मनरेगा, आवास योजना आणि कुसुम सोलार पंप योजनेवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या योजनांचे सादरीकरण केले.
महामार्ग आणि जलसिंचन प्रकल्पांवर राज्यपालांचे निर्देश
राज्यपाल राधाकृष्णन यांनी जळगावमधील अविकसित भागाच्या विकासावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. जलसिंचन प्रकल्पांच्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. तसेच, जळगाव शहरातून जाणाऱ्या १८ किलोमीटर महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुंबई आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्नही व्हावेत, अशी सूचना त्यांनी केली.