महाराष्ट्रात १.१७ लाख कोटींची गुंतवणूक; चार मोठ्या प्रकल्पांना मंजुरी, २९ हजार रोजगार निर्मितीची अपेक्षा




मुंबई: मराठवाडा, विदर्भ, पुणे आणि पनवेल येथे उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार महत्त्वाच्या प्रकल्पांना एकूण १.१७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळणार असून, या प्रकल्पांमुळे २९ हजार रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.


पनवेलमध्ये ‘टॉवर सेमीकंडक्टर कंपनी’ आणि ‘अदानी समूहा’चा संयुक्त प्रकल्प सेमीकंडक्टर निर्मितीसाठी साकारला जाणार आहे. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात ५८,७६३ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात २५,१८४ कोटी अशी एकूण ८३,९४७ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, १५ हजार रोजगार निर्मिती होईल.


पुण्यातील ‘स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया’ कंपनीला १२ हजार कोटींची गुंतवणूक मिळणार असून, एक हजार रोजगारांची संधी उपलब्ध होईल. या प्रकल्पातून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विद्युत वाहनांची निर्मिती होणार आहे. 


छत्रपती संभाजीनगर येथे ‘टोयोटा- किर्लोस्कर मोटर कंपनी’चा विद्युत वाहन निर्मिती प्रकल्प २१,२७३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह साकारला जाणार असून, १२ हजार रोजगार उपलब्ध होतील.  


वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रकल्प अमरावतीतील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमध्ये ‘रेमंड लक्झरी कॉटन्स’चा प्रकल्प मंजूर झाला असून, १८८ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५५० रोजगार निर्मिती होणार आहे.


या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे महाराष्ट्र सेमीकंडक्टर आणि विद्युत वाहन निर्मितीमध्ये आघाडीवर येईल, तसेच राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल. 


*मान्यता मिळालेले प्रकल्प:*

- पनवेल: ‘टॉवर सेमीकंडक्टर कंपनी’ व ‘अदानी समूहा’चा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प

- पुणे: ‘स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया’चा विद्युत वाहन निर्मिती प्रकल्प

- छत्रपती संभाजीनगर: ‘टोयोटा- किर्लोस्कर मोटर कंपनी’चा विद्युत वाहन निर्मिती प्रकल्प

- अमरावती: ‘रेमंड लक्झरी कॉटन्स’चा वस्त्रोद्योग प्रकल्प 


उद्योग मंत्री उदय सामंत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि प्रमुख सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post