एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६५०० रुपयांची वाढ; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत


अमळनेर: राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एप्रिल २०२० पासून ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. या निर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. गणेशोत्सवाच्या काळात संपामुळे झालेल्या असुविधेबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.


मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, आणि विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ६५०० रुपयांच्या सरसकट वेतनवाढीचा निर्णय जाहीर करण्यात आला, ज्यामुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये आनंद, तर काहींमध्ये नाराजी दिसून आली.


विश्रामगृहांच्या दुरवस्थेच्या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच, एसटीचा महसूल वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अधिक योगदान देण्याचे आवाहन केले. एसटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. 


बैठकीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत पास आणि निलंबित कर्मचाऱ्यांना पुनर्स्थापना यांसारख्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post