अमळनेरात सरासरीपेक्षा ११४ टक्के जास्त पाऊस, पिके सडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान


अमळनेर : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून अमळनेर तालुक्यात सरासरीपेक्षा ११४ टक्के अधिक पाऊस पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने पिकांचे प्रकाश संश्लेषण थांबले आहे, परिणामी अनेक पिके सडून गेली आहेत. तालुक्यात दरवर्षी ६७० मिमी पाऊस अपेक्षित असताना, यंदा ७६६ मिमी पाऊस झाला आहे आणि परतीचा पाऊस अजून बाकी आहे.

सततच्या पावसामुळे कापसाच्या पहिल्या बहराचे गळतीमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. उडीद, मूग, आणि मक्याच्या पिकांवरही विपरीत परिणाम झाला आहे. मक्याचे उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता असून, कणसांवर अळी पडल्याने उत्पादनात घट होत आहे.

ओलावा आणि पाण्याचे डबके साचल्याने शहरी भागांमध्ये पाणी शिरून नागरिकांना त्रास होत आहे. शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील यांच्यासह किसान काँग्रेसने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post