अमळनेर (जि. जळगाव): अमळनेरातील गांधलीपुरा भागात रविवारी एका ३५ वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना समोर आली आहे. शीतल जय घोगले (३५) असे या मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शीतल घोगले हिची नणंद मंगला परशुराम घोगले आणि करण मोहन गटायडे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पारोबाई परशुराम घोगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शीतल आणि मंगला सकाळी घराबाहेर गेल्या होत्या. मात्र, मंगला काही वेळात परतली, तर शीतल बराच वेळ होऊनही परत आली नव्हती.
कुटुंबीयांनी शोध घेतला असता, शीतल गंभीर अवस्थेत सापडली. तिच्या हातावर व डोक्यावर वार झाले होते. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नातेवाईकांनी शवविच्छेदन 'इन कॅमेरा' करण्याची मागणी केली असून, मृतदेह धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी सांगितले.