अमळनेरचे सध्याचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री अनिल पाटील सध्या अजित पवार गटात असूनही, त्यांचे राजकीय स्थान खिळखिळे होत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचे नाव नाही, शिवाय उमेदवारी यादीतही त्यांची अनुपस्थिती हे त्यांच्या भविष्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.
अनिल पाटील यांच्या विषयी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अनिल पाटील यांच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवले गेलेले नाहीत. पाण्याच्या समस्यांपासून ते कर्जमाफीपर्यंत, शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना झाल्या नाहीत, ज्यामुळे त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आणि रोष आहे. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही, याचा परिणाम आता अमळनेर विधानसभा क्षेत्रात दिसून येत आहे.
केवळ शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य लोकांमध्येही नाराजीचा सूर आहे. अमळनेरमधील मूलभूत सुविधा आणि विकासाची कामे रखडली आहेत. स्थानिक पातळीवर अनेक विकास प्रकल्पांचे आश्वासन दिले गेले, परंतु प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी झाली नाही. या सर्व गोष्टींमुळे अमळनेर विधानसभा मतदारसंघात अनिल पाटील यांच्याविषयी नाराजी वाढत आहे.
याच कारणांमुळे असे बोलले जात आहे की राष्ट्रवादी पक्ष या जागेसाठी आपला उमेदवार देण्यास इच्छुक नाही आणि भाजपाला या जागेवर विजय मिळण्याची संधी मिळू शकते. अनिल पाटील यांच्या कार्यप्रणालीतील उदासीनता आणि जनतेशी तुटलेला संपर्क हे त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरू शकतात.
अमळनेरची जागा भाजपाच्या हातात जाण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, आणि या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.