अमळनेर :- अमळनेर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा तांत्रिक कारणास्तव रद्द झाल्याने आणि ठिबक सिंचन अनुदानापासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. एकूण सहा ते साडेसहा हजार शेतकऱ्यांचा पीकविमा तांत्रिक त्रुटीमुळे रद्द झाल्याचे जिल्हा पीकविमा अधिकाऱ्यांनी सांगितले. ठिबक अनुदानातही तांत्रिक अडचणीमुळे १३५ शेतकऱ्यांना सुमारे १ कोटी ६५ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. या घटनांमुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे.
शेतकरी नेते आणि प्रा. सुभाष पाटील यांनी याप्रकरणात लक्ष घालत तक्रार केली. कृषी विभागाने यावर तांत्रिक चुकांची कबुली देत दुरुस्त्या करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या मोठ्या संख्येतील नुकसानीवर मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी काय भूमिका घेतली आहे? त्यांची तातडीने मदतीसाठी भूमिका आणि मार्गदर्शन अपेक्षित आहे.
यासंदर्भात शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस पावले उचलण्यात येतील का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.