अमळनेरमध्ये नाफेड अंतर्गत धान्य खरेदीसाठी एरंडोल शेतकी संघाची नियुक्ती; स्थानिक संघाच्या वगळण्यावर आश्चर्य


अमळनेर: नाफेड अंतर्गत उडीद, मूग आणि सोयाबीन धान्याच्या खरेदीसाठी जिल्ह्यातील अमळनेर शेतकी संघाला डावलून अमळनेरसाठी एरंडोल शेतकी संघाला नियुक्त करण्यात आले आहे. या निर्णयामुळे स्थानिक शेतकरी व संघटना आश्चर्यचकित झाले आहेत. खरेदी प्रक्रिया १० ऑक्टोबरपासून १४ केंद्रांवर सुरू होणार आहे.


अमळनेर तालुक्यातील उडीद, मूग आणि सोयाबीन खरेदीसाठी प्रभारी जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांनी १ ऑक्टोबर रोजी कै अण्णासाहेब मुरलीधर गंगाराम पाटील फळ व भाजीपाला खरेदी व विक्री सोसायटी चांदसर यांना आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशात ही खरेदी एरंडोल शेतकी संघाला देण्यात आली.


खरेदीसाठी ऑनलाइन नाव नोंदणी अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाजवळ सुरू करण्यात आली आहे. एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघाकडून शेतकऱ्यांना नाव नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बॅंक पासबुक झेरॉक्स व चालू वर्षाचा २०२४/२५ खरीपचा ऑनलाइन मुग, उडीद व सोयाबीन नोंदणी केलेला सातबारा उतारा दि. ५ ऑक्टोबर २०२४ पासून कार्यालयात जमा करावा लागेल.


या वर्षी हमी भाव उडीद रु. ७४००/-, मूग रु. ८६८२/- आणि सोयाबीन रु. ४८९२/- एवढा निश्चित करण्यात आलेला आहे. सदर मालाची खरेदी डी.एम.ओ. गोदाम, अमळनेर येथे करण्यात येईल. याबाबत एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि मॅनेजर यांनी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.


अमळनेर शेतकी संघ खरेदी व विक्रीसाठी सक्षम असूनही स्थानिक संघाला का डावलण्यात आले याबाबत शेतकरी आणि व्यवस्थापक संजय पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी मंत्री अनिल पाटील यांना याबाबत दखल घ्यायला सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post